नवी दिल्ली : राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना दिल्लीत वेग आला आहे. हॉटेल द लीला पॅलेसमधली खलबतं संपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या भेटीला निघाले आहेत. भेट घेण्याआधी चार तास मुख्यमंत्री आणि दानवेंची खलबतं झाली. मंत्रिमंडळ यादी आणि शिवसेनेचा वाटा यावर चर्चेची शक्यता आहे. मुख्यमंत्री, दानवे आणि महामंत्री रामलाल यांच्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनावरही चर्चा झाली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट होणार आहे. त्यांच्यासोबत भाजपचे इतर महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत एवढी गुप्तता का बाळगली, यावरुन विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात शिवसेनेला सोबत ठेवणंही भाजपसमोर आव्हान असेल. त्यादृष्टीने या बैठकीत चर्चा होऊ शकते.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होईल, अशी माहिती यापूर्वी समोर आली होती. मात्र हा मुहूर्त टळून गेला तरीही अद्याप मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत हालचाली दिसत नाहीत. यासाठीच हा दिल्ली दौरा आहे, का असा प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या भाजप शिवसेनेमधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.