इंदापूर : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर मद्यविक्रीची दुकानं 500 मीटर दूर ठेवावी लागणार आहेत. मात्र सध्या पुणे-सोलापूर मार्गावर इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीत असलेली मद्यविक्रीची दुकानं वाचवण्यासाठी काही नगरसेवक पुढे आले आहेत.


इंदापूर शहरातून पुणे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार इंदापूर शहरातील जवळपास 19 दुकाने बंद पडणार आहेत. किंवा ती महामार्गापासून दूर 500 मीटर अंतरावर स्थलांतरित करावी लागणार आहेत.

पण ही दुकाने वाचविण्यासाठी इंदापूर नगरपालिकेचे काही नगरसेवक पुढे सरसावले असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नगरपालिकेवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पळवाट काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.

इंदापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे उपनगराध्यक्ष धनंजय पाटील आणि विरोधक राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी चक्क एकत्रपणे एक अर्ज नगराध्यक्षांना दिला आहे. यामध्ये शहरातून जाणारा महामार्ग हा नगरपालिकेकडे हस्तांतरित करून घेण्यासंदर्भात विनंती केली आहे.

नगरसेवकांनी केलेल्या अर्जामध्ये मद्यविक्रीचा उल्लेख नाही. मात्र हे दोन्ही नगरसेवक मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांचे नातेवाईक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे हा महामार्ग नसल्याचा ठराव आणण्याच्या हालचाली सुरु केल्याची चिन्हं आहेत.

येत्या 21 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात आला आहे. या दोघांचा अर्ज आला असून याबद्दल निर्णय सभागृह घेईल, असं नगराध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.