नागपूर : नागपूर... गुन्ह्यांची राजधानी... असा एकही दिवस नाही... जेव्हा नागपूरमध्ये काही अघटित घडलं नाही...  रविवारचीच गोष्ट...
ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर धरमपेठमध्ये पराग परांजपेंच्या घरातून 108 तोळे सोन्यांसकट 1 कोटींचा मुद्देमाल लंपास झाला... महत्त्वाचं म्हणजे जोराने हाक मारली... तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकू जाईल इतकं जवळ घर...

आता इतक्या हायप्रोफाईल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही अशी चोरी होणं हे कशाचं लक्षण आहे? ज्यांच्याकडे गृहखात्याचा भार आहे... त्यांच्याच भागातल्या गुन्हेगारीचा दर वाढला आहे... नागपूर तर देशातली दुसरी क्राईम सिटी झाली आहे.

नागपुरात धरमपेठ भागातील गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या आहेत

9 ऑक्टोबर 2012 - वसंतराव नाईक झोपडपट्टीतल्या लोकांनी गुंडावर कारवाई न झाल्याने त्याला ठेचून ठार केलं.

25 फेब्रुवारी 2013- शंकरनगरमध्ये हेमंत दियेवार या भाजप कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या

1 एप्रिल 2013- लाहौरी बारमध्ये सुमित गाडगे या 24 वर्षीय तरुणाची भोसकून हत्या

29 सप्टेंबर 2016- गोकुलपेठ बाजारात गँगवॉर होऊन सचिन सोनकुसरे या गुन्हेगाराची 10 गोळ्या झाडून हत्या

21 नोव्हेंबर 2016- क्लाऊड सेवन बारमध्ये आमदार पुत्र आणि वेटर्समध्ये हाणामारी होऊन शुभम महाकाळकर या युवकाची हत्या

आता या सगळ्या घटना विरोधकांच्या नजरेत भरल्या नसत्या तरच नवल. नागपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरभर फिरणारा मोस्ट वॉन्टेड पप्पू यादव पोलिसांना सापडत नाही. गेल्याच आठवड्यात नागपुरात आलेल्या पोलिस महासंचालकांनी पप्पू यादवच्या मुद्द्यावरुन नागपूर पोलिसांचे वाभाडेच काढले. पप्पू यादव तुम्हाला सापडत नसेल, तर सांगा मुंबई पोलिस शोधून देतील, असं ते माथुर म्हणाले.

गृहखाते कायम मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असेल, तर प्रशासकीयदृष्ट्या बरं असतं, अशी नेहमी पळवाट दिली जाते. पण खरंच मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रालयाचा भार अती होत असेल, तर तो कमी करावा. अन्यथा नागपूरमध्ये माजलेली अराजकता तरी थांबवावी.