मुंबई : दुष्काळी भागात राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये दाखल पशुधनाच्या आहारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चारा छावण्यांमध्ये पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.


चारा छावण्यांमध्ये दाखल मोठ्या जनावरांना यापूर्वी 15 किलो हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस दिला जात होता. पण नव्या शासन निर्णयानुसार मोठ्या जनावरांना दैनंदिन 18 किलो हिरवा चारा, ऊसाचे वाडे किंवा ऊस दिला जाईल. लहान जनावरांना यापूर्वी 7.5 किलो हिरवा चारा, ऊसाचे वाडे किंवा ऊस दिला जात होते. आता त्यात वाढ करुन 9 किलो दैनंदिन चारा दिला जाईल.

चारा छावण्यांमध्ये पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यासाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम (Cattle Camp Management System) हे अॅप विकसित करण्यात आले आहे.

या अॅपमध्ये छावणी चालकाला छावणीतील पशुधनाची दैनंदिन संख्या मोजताना प्रत्येक पशुधनाच्या कानातील टॅगवरील बारकोड स्कॅन करुन माहिती अपलोड करावी लागेल. ही प्रक्रिया दिवसातून एकदा करणं बंधनकारक असेल. या नोंदीनुसारच चारा छावणी चालकांना शासनाच्या वतीने अनुदान दिले जाईल.

या प्रणालीच्या वापरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाची दैनंदिन संख्या जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना मिळणार आहे. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना http://www.charachavani.com/ या संकेतस्थळाच्या वापरासाठी स्वतंत्र यूजर नेम आणि पासवर्ड देखील देण्यात येणार आहे.

सध्या राज्यात एकूण राज्यात एकूण 1264 चारा छावण्या कार्यन्वित करण्यात आल्या असून, या छावण्यांमध्ये आठ लाख 32 हजार 29 जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 90 रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन 45 रुपये या प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.