भंडारा : जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील येरली गावात राहणाऱ्या विनोद कुंभरे या 26 वर्षीय तरुणाचा गावालगतच्या जंगलात मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. विनोदचे उद्या (मंगळवार, 06 मे)लग्न होणार होते. विनोदच्या मृतदेहाजवळच चाकू सापडल्याने त्याची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उद्या लग्न असल्याने विनोदच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला आहे. याच मंडपात त्याचा मृतदेह ठेवण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आली आहे. विनोदच्या हत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.

येरली गावातील विनोद कुंभरे हा चंद्रपूर जिल्ह्यात एका खाजगी कंपनीत काम करतो. उद्या एकाच मंडपात त्याचे आणि त्याच्या धाकट्या भावाचेदेखील लग्न असल्याने तो सुट्ट्यांवर गावी आला होता. विनोद काल काही कामानिमित्त संध्यकाळी घराबाहेर गेला होता, तो परतलाच नाही.

VIDEO | प्रॉपर्टी ब्रोकर किसन हुंडीवाले यांची निर्घृण हत्या | अकोला | एबीपी माझा



आज सकाळी गावाशेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या पोटावर एक मोठा चाकूचा वार होता आणि शरीराजवळ चाकू ठेवला होता. त्यामुळे त्याची चाकू भोकसून हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु चाकूवर रक्ताचे डाग दिसत नसल्याने हत्येचे ठिकाण दुसरे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विनोद हा आदिवासी कुटुंबातील आहे. त्याच्या पाठीमागे तीन भाऊ आणि बहीण असे कुटुंब आहे. मजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या विनोदची लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या का करण्यात आली? हे रहस्य पोलिसांना शोधून काढायचे आहे, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.