अकोला : अकोल्यातील सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. आरोपी गावंडे कुटुंबातील वडील सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक आहेत, तर मुलगा भाजयुमोचा प्रदेश उपाध्यक्ष आहे.


किसनराव हुंडीवाले यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील गजबजलेल्या अशोक वाटिका चौकातल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात आज दुपारी बारा वाजता हुंडीवालेंची हत्या झाली. लाकडी फर्निचर आणि आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरने किसनराव यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने किसनरावांचा जागेवरच मृत्यू झाला.

यावेळी हुंडीवाले यांचे वकील नितीन धूत यांच्यावरही हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या धूत यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, हे कार्यालय पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाला अगदी लागूनच आहे. शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.

हुंडीवाले आणि अकोल्यातील भाजप नेत्या आणि प्रथम महापौर सुमन गावंडेंच्या कुटुंबात हा वाद होता. ही हत्या सुमन गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलं रणजीत, प्रविण उर्फ मुन्ना आणि विक्रम उर्फ छोटू यांनी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.

आरोपी श्रीराम गावंडे हे सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक आहेत. तर विक्रम उर्फ छोटू गावंडे भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.



कोण होते किसनराव हुंडीवाले?

*अकोल्यात सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक
*अकोल्यातील कौलखेड, खडकी भागातील राजकारणावर पकड
*गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
*केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे जवळचे नातेवाईक