धुळे : सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला असून धुळे जिल्हात तापमानाचा पारा 3.4 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. तसेच ही थंडी काही पिकांसाठी लाभदायी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र हवामान खात्याने येत्या दोन दिवसात गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे.
मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सियसच्या खाली पारा गेला आहे. धुळ्यातही पारा 3.4 अंशावर स्थिरावला आहे. जिल्ह्यात परतलेली थंडी काढणीला आलेला गहू , हरभरा या पिकांसाठी तसेच आंबा पिकांच्या मोहरांसाठी लाभदायी असल्याचं कृषी क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.
धुळे जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून थंडीचा कहर पाहायला मिळतोय. 9 फेब्रुवारी रोजी तर तापमानाचा पारा 2.5 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे उबदार कपड्याच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. तसेच थंडी कमी झाली म्हणून बांधून ठेवण्यात आलेल्या गरम कपड्यांना पुन्हा बाहेर काढण्याची वेळ धुळेकरांवर आली आहे.
धुळ्यात दिवसभर गारठा राहत असल्यानं कमाल तापमानात देखील घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा हा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार आहे. तसेच येत्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
धुळ्यात हुडहुडी कायम, हवामान खात्याचा गारपीटीचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2019 01:18 PM (IST)
धुळे जिल्हात तापमानाचा पारा 3.4 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. तसेच ही थंडी काही पिकांसाठी लाभदायी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र हवामान खात्याने येत्या दोन दिवसात गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -