Milind Narvekar : शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) महाविकास आघाडीतील काही नेत्यांची सुरक्षा काढली आहे. तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. अशातच उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सहकारी मात्र, सध्या शिंदे गटाशी जवळीक वाढलेले मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नार्वेकरांना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडूनच धोका असल्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 17 वर्षाच्या काळात नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्यातच आली आहे. तब्बल सात मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांपासून ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्याचे दिसून येते.
शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकरांना 'वाय प्लस' सुरक्षा दिली होती. आता पुन्हा फडणवीस गृहमंत्री बनल्यानंतर नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता नार्वेकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह 'एस्कॉर्ट' (Y+Escort Security) राहणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काढण्याचे आदेश दिले आहेत. मागच्या काही काळापासून नव्या सरकारसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा मात्र जैसे थे ठेवण्यात आलेली आहे. तर काहींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात आता वेगळ्याचं चर्चा रंगू लागल्या आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळातही नार्वेकरांना सुरक्षा
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळातही नार्वेकरांच्या सुरक्षा देण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. तर तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील होते. यावेळी पहिल्यांदाच नार्वेकरांना सुरक्षा देण्यात आली होती. त्यापुढं शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात म्हणजे 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. त्यावेळी देखील नार्वेकरांना 'वाय प्लस' सुरक्षा देण्यात आली होती.
'या' मुख्यमंत्र्यांच्या काळात नार्वेकरांना सुरक्षा
दिवंगत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे या सर्व मुख्यमंत्र्यांच्या काळात नार्वेकरांना सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांना भेटत राहिल्याने या सरकारमध्ये नार्वेकरांना महत्त्व आलं आहे. एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवात नार्वेकरांच्या घरी आल्याने या दोघांमधील मैत्री उघड झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतही तर मिलिंद नार्वेकर साऱ्यांचे मित्र असल्याने ते चांगल्या मतांनी जिंकल्याचे फडणवीस म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी देखील नार्वेकरांची जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात नार्वेकरांची जोरदार चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: