Pune PCMC Autorickshaw Fares: पुणे (pune), पिंपरी-चिंचवड (pcmc) आणि बारामती शहरात ऑटोरिक्षांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून ही दरात वाढ होणार आहे. सध्या प्रत्येकी दीड किलोमीटर अंतरावर पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती शहरात नागरिकांना रिक्षासाठी 21 मोजावे लागतात. मात्र 1 ऑगस्टपासून नागरिकांसाठी हे दर 23 रुपये करण्यात आले आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 15रुपये मोजावे लागणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली आहे. 


इंधन दरवाढीमुळे गेले अनेक दिवस रिक्षाचालकांकडून भाडे किंवा दरवाढीची  मागणी करण्यात येत होती. त्यांच्या याच प्रयत्नांना यश मिळालं आहे. परिवहन प्रादेशिक प्राधिकरनाने मान्य केली आहे. या संदर्भातील नुकतेच आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार 2 रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालकांना थोडाफार दिलासा मिळालाय मात्र सामान्. नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


इंधनदरावाढीमुळे भाडं वाढीचा निर्णय


विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तसेच खटुआ समितीच्या शिफारशीला अनुसरून ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यामुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे. सुधारित केलेल्या दरावर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी रात्री 12  ते सकाळी 5 या कालावधीसाठी 25 टक्के अतिरिक्त भाडेदर असणार आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री 12  ते सकाळी 5 या कालावधीसाठी 40 टक्के अतिरिक्त भाडेदर राहणार आहे.


30 सप्टेंबरपर्यंत मीटर कॅलीब्रेशनची मुदत


ऑटोरिक्षाचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलीब्रेशन)  1ऑगस्टपासून 30  सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे ऑटोरिक्षा चालक 1 ऑगस्टपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडे सुधारणा लागू राहणार आहे.  मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.