औरंगाबाद : नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरोधात प्राप्तीकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) मराठवाड्यातील 400 जणांची यादी तयार केली असून आतापर्यंत 17 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.


प्राप्तीकर विभागाने चार दिवसांपासून औरंगाबादसह वैजापूर, जालना, बीड आणि लातूरमधील 17 ठिकाणी छापे टाकून सुमारे 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रक्कम उघड केली आहे. औरंगाबादेतील आठ, वैजापुरातील दोन, जालन्यातील दोन, बीडमधील दोन, तर लातूरमधील तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

परळीजवळच्या एका कारखान्यात नोटाबंदीवेळी कामगारांना एक कोटींचा आगाऊ पगार दिला गेला. हा पगार संपूर्ण जुन्या नोटांचा स्वरुपात होता, अशीही माहिती या कारवाईतून पुढे येत आहे. मात्र तो कारखाना कोणता होता, त्याचा तपशील अद्याप जाहीर केला गेलेला नाही.

नोटाबंदीच्या काळात बचत खात्यांमध्ये अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार झालेले खातेधारक तसेच चालू खात्यांमध्ये 12 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलेल्यांची माहिती बँकांद्वारे प्राप्तीकर विभागाला प्राप्त झाली आहे. त्यावरुन प्राप्तीकर विभागाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर न देणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे.