PM Narendra Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्टला पुणे (PM Narendra Modi) दौऱ्यावर असणार आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या मार्गिकांचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी पुण्यात येणार असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली जात आहे. त्यांच्या सभेसाठी पुण्यातील स.प. महाविद्यालयात भव्य मंडप उभारण्यात येत आहे. पावसाळा असल्याने हा मंडप संपूर्ण बंद असणार आहे. त्यासोबतच त्यांच्या संरक्षणासाठीदेखील मोठी तयारी करण्यात येत आहे. 


पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला. आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे हे देखील होते. 


मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन


या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जोडले जाणार असून पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडत असल्याने  पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय  उपलब्ध होणार असून शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.


असा आहे मेट्रो मार्ग...



पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या 6.9  किलोमीटरच्या मार्गिकेवर 4  स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या 4.7  किलोमीटरच्या मार्गिकेवर 7 स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 21 स्थानकांसह 23.66  किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होणार आहे


हेही वाचा-


Pune NIA News : मोठी बातमी! इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँम्ब स्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर