Hindu Jan Akrosh Morcha : मागील काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात देखील हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 जुलै रोजी फुलंब्री शहरात हा मोर्चा निघणार आहे. लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर अशा अनेक विषयांच्या विरोधात हा मोर्चा निघणार आहे. तर या मोर्च्यासाठी फुलंब्री तालुक्यासह परिसरातील नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल, गोहत्या जिहाद या नावाखाली अनेक घटना घडत आहेत. यात लव्ह जिहादमध्ये फुलंब्री तालुक्यातुन 7 ते 8 हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले. या प्रकरामुळे तालुक्यात सकल हिंदूंमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व हिंदू एकत्रित येऊन त्यांनी शहरात रविवार (30 जुलै) रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर, फुलंब्री शहरात निघणाऱ्या या मोर्च्यात 50 हजार महिला, पुरुष सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तर, बाजार समिती प्रवेश द्वारावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मोर्चास प्रारंभ होणार असून, खुलताबाद रस्त्यावर जाहीर सभा होणार आहे. यात धनंजय देसाई हे प्रमुख वक्ते असणार आहे.

50 हजार लोकं येणार असल्याचा दावा

मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मातरांचे मोठे प्रकार समोर येत आहेत. ज्या मुली पळवून नेल्या आहेत, त्यातील अनेक मुलींचा ठावठिकाणा नसून त्यांचे धर्मांतर करून त्यांचे विवाह करून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. हैदराबाद आणि मुंबई या ठिकाणी मुलीला पळवून नेले जात असून, असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण बंद झाले आहे. याबाबत सर्वांनी विचार करून हिंदू जनजागृतीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये 50 हजार महिला, पुरुषांची उपस्थिती रहाणार आहे. संपूर्ण 98 गावांत बैठका झाल्या असून, या बैठकांचे गेल्या 20 दिवसांपासून काम सुरु असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी विजय औताडे, प्रभाकर मते, प्रमोद मुठ्ठे, योगेश पाथ्रीकर, दत्ता सपकाळ, संजुळचे सरपंच योगेश जाधव, मयूर कोलते, साईनाथ बेडके यांची उपस्थिती होती. 

वाहतुकी व्यवस्थेत बदल

फुलंब्री येथील हिंदू जनआक्रोश मोर्च्याच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत बदल केला गेला आहे. 30 जुलै रोजी पोलीस ठाणे फुलंब्री हद्दीतील जाणारे महामार्ग क्रमांक NH-752 वरील फुलंब्री टी पॉईट ते कृषीउत्पन्न बाजार समिती या महामार्गावर सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फुलंब्री तालुक्यासह परिसरातील नागरिक मोठया प्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यामुळे या मार्गावरुन जाणारी सर्व जड वाहनासह इतर वाहनांची वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने याठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचे नियमन आणि नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने नागरिकांची आणि वाहनधारकांची गैरसोय होवुन नये, म्हणून पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या आदेशानुसार सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे.

असा असेल वाहतुकीतील बदल...

 पुर्वीचा जड वाहतुक मार्ग बदल करण्यात आलेला जड वाहतुक मार्ग
जळगाव, सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीडकडे जाणारी जड अवजड वाहणे.  खामगाव फाटा, खामगाव, बाबरा, निधोना, आडगाव, वाहेगाव, पिपळगाव वळन, मार्गे देवगिरी साखर कारखाना खुलताबाद कडुन दौलताबाद टी- पॉईट वरुण अहमदनगर, बीड, नाशिक, औरंगाबाद कडे जातील.
अहमदनगर, बीड, जालना, औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, जळगाव कडे जाणारी जड अवजड वाहणे दौलताबाद टी-पॉईंट वरुण खुलताबाद, देवगिरी कारखाना मार्गे पिपळगाव वळन, आडगाव, वाहेगाव, निधोना, बाबरा, खामगाव, खामगाव फाटयावरुण सिल्लोड, जळगावकडे जातील.
औरंगाबाद ते खुलताबाद फुलंब्री मार्गे जानारी जड अवजड वाहने. औरंगाबाद, चौका, गणोरी फाटा, गणोरी गाव, सगाव फाटा, मार्गे खुलताबादकडे जातील.
खुलताबाद ते फुलंब्री मार्गे औरंगाबाद कडे जाणारी वाहने. खुलताबाद, एसगाव फाटा, गणोरी गाव, गणोरी फाटा, चौका, मार्गे औरंगाबाद कडे येतील.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad: विद्यार्थ्यांना टिळा, गंध लावण्यास शाळेचा विरोध; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक