बेळगाव : भारतातील पहिल्या आगळ्यावेगळ्या बस स्टॉपचे उदघाटन आज बेळगावात होणार आहे. कॉफी शॉप, वेळ घालविण्यासाठी टीव्ही, मोफत वायफाय अशा आधुनिक सुविधा या बस स्टॉपवर आहेत. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या संकल्पनेतून हा बसस्टॉप साकारण्यात आला आहे.
बस स्टॉपवर कॉफी शॉप, टीव्ही आणि मोफत वायफाय ही सुविधा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. बस येण्यास वेळ असेल तर टीव्हीवर बातम्या बघून वेळही घालवता येतो आणि स्वतःला अपडेट देखील ठेवता येते.
शहरातील सिटी बस स्टॉप म्हणजे भिकारी, मोकाट जनावरे यांचे आश्रयस्थान असेच काही ठिकाणी चित्र पाहायला मिळते. मात्र बेळगावातील या हायफाय बस स्टॉपची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा यांचे नाव बस स्टॉपला देण्यात आले आहे.
बस स्टॉपमधील छत देखील घरातील हॉल प्रमाणे बनविण्यात आले आहे. बस स्टॉपवर नजर ठेवण्यासाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली. ठळकवाडी येथील आरपीडी कॉर्नर येथील या बस स्टॉपचे उदघाटन सोमवारी सायंकाळी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे.