बेळगाव: बेळगावमधील ठळकवाडीतील द्वारकानगर येथे दिवसाढवळया 58 वर्षीय महिलेचे हातपाय बांधून आणि टॉवेलनं गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. भार्गवी मोरप्पणवर असं मृत महिलेचं नाव आहे.
भार्गवी यांचे पती आनंद हे बेळगावात डीएफओ असून दुपारी घरी जेवायला आले असताना हा प्रकार उघडकीस आला. सकाळी पती-पत्नी दोघेही दवाखान्यात गेले होते. त्यानंतर भार्गवी या घरी परतल्या. त्यानंतर अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून भार्गवी यांचे हातपाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून टॉवेलनं गळा आवळून त्यांची हत्या केली.
विशेष म्हणजे भार्गवी यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्यांच्या घरातील कोणतीही वस्तू चोरली नाही. त्यामुळे ही हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली याचा उलगडा होऊ शकलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. तसेच मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.
भार्गवी या एका खासगी कॉलेजात काही काळ प्राध्यापकही होत्या. तसेच बेळगावच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा आवर्जून सहभाग असायचा. त्यांच्या हत्येमुळे परिसरात सध्या घबराटीचं वातावरण आहे.