वाशिम : एकीकडे शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून प्रतीक्षेत असतो. मात्र असं असलं तरी वाशिमच्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे तुरीच्या पिकाला मिळणारा जादा दर. आज पुन्हा तुरीच्या भावामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून आता 9500 रुपये प्रती क्विंटल दराने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे.


वाशिमच्या बाजार समितीमध्ये सध्या तुरीच्या विक्रीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कारण तुरीच्या बाजारभावाने सहा वर्षांत पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. 2014 मध्ये 13 हजार रुपये प्रती क्विंटल दराने विक्रीनंतर, गेल्या सहा वर्षात तूर विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता बाजार समितीमध्ये तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अडीच ते साडे तीन हजार रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे.


लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार थांबले होते. अनलॉक प्रक्रियेत हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. यानंतर मागणी वाढल्याने तुरीचे दर वाढले असल्याचं कळतं. तर या वर्षी खरीप हंगामात पिकाचं मोठं नुकसान झालं. परिणामी पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याने दरवाढ होत असल्याचं जाणकार सांगतात.


एकट्या वाशिम जिल्ह्यात एक लाख नऊ हजार 231 क्विंटल तूर शासनाने 5800 रुपये दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजच्या दराच्या तुलनेत 3 हजार रुपये नुकसान होत आहे. मात्र या खरेदीतून सरकारला जवळपास 30 कोटी रुपयांचा फायदा सरकारला झाला. अशाच प्रकारे राज्यातील इतर जिल्ह्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे सरकारने आधारभूत किमतीने विक्री केलेल्या नफ्यामधून शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.


एकूणच तूर उत्पादक शेतकऱ्यांना जरी अच्छे दिन आले असले तरी मात्र या दरवाढीचा फटका तूरडाळ खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे येत्या काळात तूरडाळीची 150 रुपये दराने विक्री झाली तर नवल वाटायला नको.


तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस, यंदा हमीभावापेक्षाही जास्त दर