नांदेड : प्राणीमात्रांवर प्रेम करणं म्हणजे पुण्याचं काम म्हटलं जात, त्यात आपल्या लाडक्या जनावरांवरील प्रेमापोटी लोक काय करतील आणि काय नाय? याचाही नेम नाही. नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने तर चक्क गायीच्या वासराचं बारसं घातलं आहे. या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवल्याचंही समोर आलं आहे. देगलूर तालुक्यातील खानापूर येथील एका शेतकरी कुटुंबाने आपल्या गायीवरील प्रेमापोटी असा आगळा-वेगळा सोहळा ठेवला आहे.


खानापूर येथील पशुपालक शेतकरी मारोती मारजवाडे यांना लॉकडाऊन काळात रस्त्याच्या कडेला बेवारस तडफडत पडलेले दिव्यांग गायीचे वासरु आजपासून दोन वर्षापूर्वी सापडले होते. हे वासरु पाय मोडलेल्या अवस्थेत विव्हळत रस्त्याच्या कडेला पडले होते. दरम्यान पशु प्रेमी असणाऱ्या मारोती मारजवाडे यांनी या वासराला पाहताच त्याला घरी आणून त्याच्यावर उपचार केले. योग्य औषध उपचार करून या गायीच्या पिलाचे त्यांनी पालन पोषण केले. तसंच त्यांना एक मुलगाच असल्याने त्यांना आणि पत्नी आरतीबाई मारजवाडे यांना मुलगी नसल्याची खंत होती. त्यामुळे मारजेवाड जोडप्याने या वासराचे पोटच्या लेकीप्रमाणे पालन पोषण केले. हळूहळू या गायीचा संपूर्ण मारजवाडे कुटुंबाला लळा लागला. मारजवाडे कुटुंबीयांनी या गायीचे नाव सोनी असे ठेवले. त्यानंतर आता या गायीला वासरु झाले असून त्याचा आज नामकरण सोहळा ठेवण्यात आला होता. दरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या नावावरून या वासराचे नाव बसवान्ना ठेवण्यात आले आहे. दरम्यान दोन वर्षे आपल्या मुलाप्रमाणे संभाळलेली सोनी गाय कधीकाळी दिव्यांग होती असे आता वाटत नाही. आज दोन वर्षांनंतर ह्या गायीने वासरास जन्म दिला आहे. त्यामुळे आनंदून गेलेल्या मारजेवाड कुटुंबाने वासराचे बारसे घालत गाव जेवण देखील ठेवले आहे.


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha