अकोला : पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील, असा इशारा आमदार बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे.  ते अकोल्यातील मुक्काम मोर्चातील भाषणात बोलत होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे देण्यासाठी उशीर करणाऱ्या प्रशासनाला आमदार बच्चू कडूंनी धारेवर धरले आहे. पुढच्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या. नाही तर अमरावतीचं विभागीय मार्केटींग अधिकाऱ्यांचं कार्यालय जाळू अशी धमकी बच्चू कडूंनी सरकारला दिली आहे. आमदार बच्चू कडूंनी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन मोर्चा काढला होता. मात्र, सरकारनं मोर्चातील मागण्या सोडण्यासाठी वीस दिवसांचा अवधी मागितला आहे. सरकारच्या वेळकाढूपणाचा निषेध करीत आंदोलकांनी बैलगाडी जाळत सरकारचा निषेध केला आहे. 19 ते 24 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचा अल्टीमेटम आमदार बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. नुकतेच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात थेट नागपूरच्या आमदार निवासाचाच ताबा घेतला होता.  आंदोलकांनी गच्चीवरुन पाण्याची टाकी खाली टाकली आणि दगडफेकही होता. तर नागपुरात ‘महापरीक्षा’ पोर्टलविरोधात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात देखील शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.  'महापरीक्षा' पोर्टलच्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडू यांनी माहिती आणि तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी यांना विचारणा केली होती. या भेटीदरम्यान बच्चू कडू आणि माहिती, तंत्रज्ञान संचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी बच्चू कडू यांनी माहिती आणि तंत्रज्ञान संचालकांवर लॅपटॉप उगारला होता.