Chandrakant Patil : गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यावरून कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चाची घोषणा करण्यात आल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. गायरानवरील अतिक्रमण काढून घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असून व्यक्तिगत कामासाठी गायरान वापरू नये असा कायदा आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते म्हणतात की ही अतिक्रमण काढू देणार नसल्याचे म्हणत आहेत. लोकांना उकसवण्याचा हा प्रकार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. व्यक्तीगत आपलाही अतिक्रमण काढण्याला विरोध असल्याचेही ते म्हणाले.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, कायद्यामध्ये बदल करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतील. तोपर्यंत अतिक्रमण काढू नये याबाबत उपमुख्यमंत्री विनंती करणार आहे. सरकार याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करतील. कोल्हापूर जिल्ह्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात 15 नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. 


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमणे काढून टाकण्याचा कालबद्ध आराखडा निश्चित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होणार असली, तरी त्यामुळे जिल्ह्यातील सव्वा लाखाहून अधिक अतिक्रमणे निघणार असून, सुमारे सहा लाख नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे घरे हटवल्यास हक्काचा निवारा नाहीसा होणा आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात तत्काळ याचिका दाखल करावी, जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


गायरान जमिनीतील अतिक्रमणे काढण्यासाठी तालुका स्तरावर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिले आहेत. दुसरीकडे  कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक अतिक्रमणे निघण्याची शक्यता असून त्यामुळे सहा लाखांवर बेघर होणार आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या