Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलानेच राडा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांनी क्रिकेट सामना सुरु असताना पंचांसोबत वाद घालून त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. या सोबतच सामन्याच्या आयोजकांनाही मारहाण केल्याचं समजतं या संदर्भात पंचांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याने पंचांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात सध्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सुरु असेलल्या क्रिकेट सामन्यात यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याने या महोत्सवाला गालबोट लागलं आहे. 


थ्रो बॉलच्या मुद्द्यावरुन वाद, पंचांसह सामन्याच्या आयोजकांना मारहाण


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती चौकात खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत खामला इलेव्हन आणि स्टार इलेव्हन या दोन संघामध्ये सामना होता. यातील एका संघात मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आणि करन हे दोघेही खेळत होते. सामना सुरु असताना अर्जुनने थ्रो बॉलच्या मुद्द्यावरुन पंचांशी वाद घालायला सुरुवात केली. पंचांनी त्याला समजावून सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता. अर्जुनने रागाच्या भरात ग्राऊंडवरच गोंधळ घालायला सुरुवात केली. तरीही पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्याने त्याने भर मैदानात प्रेक्षकांसमोरच पंचांना आणि आयोजकांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर यादव समर्थकांनीही वाद शमवण्यापेक्षा अर्जुनला साथ देत मैदानात गोंधळ घातला. 


सामना सुरु असतानाच असा गोंधळ झाल्यामुळे आयोजकांनी सामना बंद केला. घडलेल्या सर्व प्रकाराची महोत्सवाचे आयोजक संदीप जोशी यांच्याकडे करण्यात आली. मात्र दोन दिवस उलटूनही आयोजकांनीही यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणातील पीडित पंचांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.


पोलिसांकडून पहिल्या दिवशी नकार


प्राप्त माहितीनुसार संबंधित पंच तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. मात्र ते सध्या दुसऱ्या कंपनीसोबत यूएस शिफ्टमध्ये काम करत असल्याने ते निघाले. नंतर पुन्हा शुक्रवारीही ते पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असल्याची माहिती आहे. यावर पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय आयोजकांकडून यासंदर्भात कारवाई करण्याचे धाडस करण्यात येईल का असा सवालही अनेकांनी यावेळी उपस्थित केला आहे.


ही बातमी देखील वाचा...


शिक्षक, पदवीधर मतदारांनो ही काळजी घ्या, अन्यथा तुमचे मतदान ठरेल अवैध, जाणून घ्या सविस्तर...