Nagar Panchayat Elections 2022 Result : राज्यातील नगरपंचायतीचे बऱ्यापैकी निकाल आता हाती आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने सर्वात जास्त जागा मिळवल्या आहेत. अशातच काही ठिकाणाहून धक्कादायक निकाल हाती आले आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना नाशिक जिल्ह्यातील कळवण नगरपंचायत निवडणुकीमध्ये जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी डॉ. पवार यांचे दीर आमदार नितीन पवार यानी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देत चक्क 9 जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. 


भारती पवार यांना स्वत:च्या दिंडोरी मतदारसंघात नगरपंचायत निवडणुकीत अपयश आले आहे. त्यासोबतच कळवण नगरपंचायतीतही त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरं जावे लागले आहे. डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.


कळवणध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी 9 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने तीन जागांवर, तर शिवसेना आणि भाजपला केवळ प्रत्येकी दोन-दोन जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक जागा पटकावली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे दीर आणि आमदार नितीन पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा निवडून आणण्यासाठी जोर लावत रणनीती आखली होती. ती आजच्या निकालातून साध्य झाल्यचे दिसत आहे.


कळवण नगरपंचायत


एकूण जागा – 17
राष्ट्रवादी काँग्रेस – 9
काँग्रेस – 3
शिवसेना – 2
भाजप – 2
मनसे – 1


नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमध्ये जवळपास सर्वच पक्षांना मतदारांनी समान संधी दिली आहे. सहा पैकी भाजपने दोन व राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन नगरपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. शिवसेनेला निफाड नगरपंचायत जिंकली आहे. तर, महाविकास आघाडीनं एका पंचायतीवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निकालांनी प्रस्थापितांच्या वर्चस्वाला मात्र धक्के दिले आहेत.


राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान झाले होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी काल मतदान झाले होते.
त्याचे निकाल आज हाती येत आहेत.