मुंबई : राज्यासह देशातलं तापमान आणि हवामान वेगानं बदलत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 6 ते 8 मार्चदरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे.


हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळेंनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, तसेच काढणीला आलेल्या पिकांची काढणी करुन आठवडाभरासाठी सावध रहावं, असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पिकांचं संरक्षण करण्यासाठी पूर्व उपाययोजना म्हणून कृषी विभाग किंवा तज्ज्ञांची मदत घेऊन त्यावर शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे. गेल्या वर्षीही फेब्रुवारीमध्ये गारपीटीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी वेळीच सावध राहत काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे.

शेतकऱ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी

  • सध्या अनेक ठिकाणी गहू काढणीला आला आहे. त्यामुळे गहू तातडीने काढून घ्यावा. अन्यथा पाऊस झाल्यास त्याचा फटका बसू शकतो.

  • कापसाची साठवणूक केलेली असेल, तर त्याची विक्री करावी आणि शेतातील शिल्लक कापूस लवकरात लवकर काढून घ्यावा.

  • अवकाळी पावसाअगोदर जनावरांची काळजी सोय करुन ठेवणं सर्वात महत्वाचं आहे. जनावरांसाठी चांगल्या आणि टिकाऊ गोठ्याची सोय केल्यास ऐन पावसात जनावरांना त्रास होणार नाही.

  • कांद्याची साठवणूक सुरक्षित ठिकाणी करावी.

  • गारपीट झाली तर द्राक्षाला मोठा फटका बसू शकतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूर्व उपाय करणं गरजेचं आहे.