बीड: अंबाजोगाई येथील एका खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांतील किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना काल दुपारी घडली. अंबाजोगाईतील नागझरी परिसरातील अमृतेश्वर नगरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या प्रकरणातील दोन्ही मुलं ही दहावीचे विद्यार्थी असून अवघे 15 वर्षे वयाचे आहेत. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीने अंबाजोगाई शहरातून पळ काढला.


दत्ता अशोक हजारे (वय 15, रा. पोळ पिंपरी, ता. परळी) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बर्दापूर येथील रेणूका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. दत्ताचे वडील शेतमजूर असून त्यांना दोन मुली आणि एकुलता एक मुलगा होता. वसतिगृहात दत्ता सोबत आणखी एक दहावीचा विद्यार्थी राहत होता.


आज सकाळी दत्ता आणि त्या विद्यार्थ्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघेही शाळेत प्रथम सत्र परीक्षा आटोपून वसतिगृहात परतले. त्यानंतर दत्ता हजारे वसतिगृहाच्या छतावर अभ्यास करत बसला होता. दुपारी तो विद्यार्थी दत्ता जवळ आला आणि सकाळच्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या डोक्यात जड वस्तू मारली. हा घाव वर्मी बसल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झाला. दत्ता निपचित पडल्याचे पाहून त्या विद्यार्थ्याने घटनास्थळाहून पळ काढला.या दोन मुलात नेमके कोणत्या कारणाने भांडण झाले हे कळू शकलेले नाही.