पंढरपूर : अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेपासून रोखण्याचा इशारा देणारे सकल मराठा मोर्चाचे रामभाऊ गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. रामभाऊंना अखेर 81 दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला

गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या रामभाऊ यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये मराठा मोर्चाने रामभाऊला वाऱ्यावर सोडल्याचं म्हटलं होतं. मात्र मराठा मोर्चा रामभाऊच्या कुटुंबाला सर्व ती मदत करत आहे, आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडलं नसल्याचं मराठा मोर्चाचे समन्वयक मोहन अनपट यांनी सांगितलं होतं

विशेष म्हणजे रामभाऊ याच्या कुटुंबानेही सकस मराठा समाजाचे आभार मानत मराठा समाजाने आधार दिल्याचे सांगितले होते.
मराठा आरक्षण दिल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना पंढरपूर मध्ये पाऊल न ठेवू देण्याचा इशारा मराठा मोर्चाने दिला होता. यावेळी आंदोलनांचं नेतृत्व करणारे रामभाऊ गायकवाड यांना १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.

आता जवळपास ८० दिवस त्यांना जामीन न मिळू शकल्याने त्यांना जेलमध्येच राहावे लागले होते. रामभाऊ गायकवाड हे गुरसाळे येथील शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. ते आपल्या विधवा आई ,पत्नी आणि दोन लहान मुलींसह शेतातच राहतात . रामभाऊ याला जामीन मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.