Malhar Koli Mahadev Koli community on Hyderabad Gazetteer: मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझिटिअर लागू करण्यासाठी सरकारकडून जीआर काढण्यात आल्यानंतर आता मल्हार कोळी, महादेव कोळी समाज बांधवांकडून त्यांच्यासाठी हैदराबाद गॅझिटिअर लागू करण्याची मागणी केली आहे. मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा समाज बांधवांनी दिला आहे. मागील 75 वर्षांपासून सुरू असलेल्या जातीच्या प्रमाणपत्रांच्या न्याय हक्कासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्र भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून जात प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाने आश्वासने दिली, मात्र ठोस निकाल आजतागायत न लागल्याने समाजात तीव्र असंतोष आहे. दरम्यान, मराठा समाज बांधवांसाठी हैदराबाद गॅझिटिअर लागू करण्याबाबत जीआर काढण्यात आला, त्यात आमचाही समावेश व्हावा अशी मागणी होत आहे.

कोणत्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या? 

महादेव कोळी, आदिवासी कोळी, मल्हार कोळी समाजाच्या नागरिकांना त्वरित जात प्रमाणपत्र द्यावे.रक्त नात्यातील व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी परिपत्रक काढावे.1950 पूर्वीच्या कोळी नोंदींवर आधारित प्रमाणपत्र निर्गमित करावे.टीसी, वडिलांचे जात प्रमाणपत्र, 36अ नोंदी, निर्गम उतारा याच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे.

बबनराव तायवाडे यांचे काँग्रेस नेत्यांना खुले आव्हान

दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी काँग्रेस नेत्यांना आव्हान दिलं आहे. राज्य सरकारने आमच्या 14 पैकी ज्या 12 मागण्या मान्य केल्या, त्या संदर्भात शासन आदेश काढण्यासाठी आम्हाला राज्य सरकारने उद्याला बैठकीला बोलावले आहे. ज्या काँग्रेस नेत्यांना मराठा संदर्भतल्या शासन आदेशाला आक्षेप आहे की ओबीसी समाजाचे नुकसान झाले त्यांच्यासोबत मी खुल्या व्यासपीठावर चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नवीन शासन आदेशाने ओबीसी समाजाचे नुकसान झाले नाही या भूमिकेवर मी आजही ठाम आहे, असे मतही बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे सोडले तर कोणत्याही  मराठा अभ्यासक नेता असे म्हणत नाही, की नवीन शासन आदेशाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल असे देखील तायवाडे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या