मुंबई : राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदा कोरोना महामारीमुळे अतिशय शांततेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरी भागात महापालिकांकडून कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली होती. तर खेड्यापाड्यातही ओढा, नदीसह विहिरीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आहे.
दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. वरळीतल्या जांभोरी मैदानात तीन कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत. या परिसरात गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले होते.
आज पुण्यात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी पुण्यात महापालिकेच्या वतीने फिरते हौद करण्यात आले होते. पुण्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने बाप्पाची घरीच विसर्जन करण्याचं आवाहन महापालिका व पोलीस प्रशासनाने केला आहे .त्या पार्श्वभूमीवर आज संपुर्ण शहरात 30 फिरते हौद होते. हे ट्रक मध्ये हौद बनवले आहेत. ते संपूर्ण शहरात फिरणार आहेत. आज सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या हौदाचं उद्घाटन केले.
कोकणातही साध्या पद्धतीने विसर्जन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दीड दिवसांनी आपल्या लाडक्या बाप्पाच विसर्जन होत आहे. गणेशोत्सव म्हटलं की कोकणातील घराघरात आनंदी व भक्तिमय वातावरण असतं. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने गणेश चतुर्थी कोकणी माणूस अत्यंत साध्या पद्धतीने मात्र उत्स्फूर्तपणे साजरा करत आहे. दरवर्षी वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन मिरवणूक काढत केलं जातं. मात्र, कोरोनाच सावट असल्याने साध्या पद्धतीने गणेश विसर्जन केले जात आहे. यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली ठरवून दिली होती. विसर्जन मिरवणूक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विहीर, तलाव, ओहोळ, नदी व समुद्र किनारी साध्या पध्दतीने आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केले जात आहे.
तासगावात ऐतिहासिक रथोत्सव सोहळा रद्द
कोरोनामुळे तासगावच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन साध्या पद्धतीने पार पडले. तसेच ऐतिहासिक रथोत्सव सोहळा देखील यावेळी रद्द करण्यात आला होता. यंदाचे सोहळ्याचे हे 241 वे वर्ष होते. 241 वर्षात तीनवेळा विविध कारणांनी संस्थानचा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदा रथा ऐवजी मोटारीचा वापर करून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; कोरोना संसर्गामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2020 06:32 PM (IST)
राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यंदा कोरोना महामारीमुळे अतिशय शांततेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -