मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही प्रामुख्याने घाटमाथ्याच्या क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भासह राज्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे.
जूनमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला असला, तरी जुलैच्या पावसाने अनेक भागांत हुलकावणी दिली. उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचे संकेत आहेत. परिणामी राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. याच स्थितीमुळे काही ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस, तर तीन ते चार दिवस राज्यात सर्वत्र पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 3 ऑगस्टला पावसाचा जोर वाढणार आहे. या दिवशी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. 4 ऑगस्टला कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 5 ऑगस्टलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक पावसाचा अंदाज आहे.
तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या भागांत अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार, तर नाशिक, नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल, अस पुणे वेधशाळेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.