India Weather Update 14 January 2022 : सध्या देशातील बहुतांश भागात थंडीची मोठी लाट आली आहे.  तसेच अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच येत्या दोन दिवसात पूर्व आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतात खूप दाट धुके पसरणार आहे. 16 आणि 17 जानेवारीला उत्तर-पश्चिम हिमालय तर 18 ते 20 जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतातील भागावर याचा परिणाम होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर आज महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
 
या राज्यांमध्ये पावसाची शक्यता


सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पावासाची शक्यता वर्तवली आहे. पावसाची शक्यता असलेल्या राज्यांमध्ये बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्किम, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच छत्तीसगडमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 आणि 15 जानेवारीला म्हणजे आज आणि उद्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवसांमध्ये तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगीट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या उंच भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, तर बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: