सांगली : प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे.


मराठी विश्वातील प्रसिद्ध गझलकार अशी इलाही जमादार यांची ओळख होती. इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून इलाही जमादार यांची विशेष ओळख होती.


विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिक आणि मासिकांतून इलाहींच्या कविता आणि गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घ्यायचे. मराठी गझल विश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणाऱ्या इलाही जमादार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्यानं मराठी गझल विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इलाही यांच्या जाण्यानं गझल विश्वातील एक तारा निखळला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने आणि मुशायरे यात भाग घेतला आहे. इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि महाराष्ट्राबाहेरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे आणि मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होत असत. इलाही यांनी 'जखमा अशा सुगंधी' आणि 'महफिल-ए-इलाही' या नावांनी मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.