मुंबई/धुळे : एसटीने प्रवास करत असताना मार्गात काही वेळा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर प्रवाशांचा खोळंबा होतो. ज्या प्रकारच्या बसने प्रवासी प्रवास करत असतील त्याच प्रकारच्या बसमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागतो. मात्र यापुढे असे होणार नाही,


तुम्ही ज्या एसटीने प्रवास करत आहात, त्यापेक्षा उच्च श्रेणीच्या बसमधूनदेखील प्रवाशांना मूळ तिकीट दरात (कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता) प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. तसे परिपत्रकदेखील लवकरच जारी करण्यात येणार आहे.

मार्गात तांत्रिक कारणांमुळे एसटीत झालेला बिघाड, अपघात अथवा काही अडचणींमुळे एसटी बस बंद पडल्यास त्या बसमधील प्रवाशांना पुढील प्रवास त्याच प्रकारच्या बसमधून करणे अनिवार्य होतं. त्यापेक्षा उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त तिकीट दर आकारला जात असे. काही मार्गांवर बसची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना त्याच श्रेणीतील पर्यायी बस उपलब्ध होईपर्यंत ताटकळत थांबावे लागत असे. यामुळे प्रवाशांमध्ये एसटीविषयी प्रतिकूल मतं बनत असल्याचे प्रवाशांच्या तक्रारींवरून निदर्शनास आल्याने एसटी महामंडळाने याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या निर्देशानुसार नियमात बदल करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने लवकरच एसटी महामंडळ प्रशासनाकडून या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या नव्या परिपत्रकानुसार मार्गात बिघाड झालेल्या साध्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला त्याच तिकीट दरात उच्च श्रेणीच्या एसटी बसमधूनदेखील प्रवास करता येणार आहे. याचा लाभ सामान्य प्रवासी, पासधारक प्रवाशांनादेखील होणार आहे. या योजनेस एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मान्यता दिल्याने लवकरच या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल.