अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उपमहापौर श्रीपाद छिंदमचा राजीनामा आज (मंगळवार) मंजूर करण्यात आला. महापौर सुरेखा कदम यांनी छिंदमचा राजीनामा मंजूर केला.


शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं छिंदमला भाजपातून बडतर्फ करण्यात आलं होतं. आता छिंदमचं नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी महापौरांना पत्र देऊन तात्काळ विशेष सभा घेण्याची मागणीही केली आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर छिंदमनं महापौर आणि आयुक्तांना शनिवारी आपला राजीनामा सादर केला होता. मात्र, सलगच्या सुट्ट्यांमुळे पालिकेचं कामकाज आज सुरु झालं. पण कामकाज सुरु होताच सर्वप्रथम छिंदमचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांबद्दल अनावधानाने केलेल्या दुर्दैवी वक्तव्यानं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मी केलेलं वक्तव्य माफीलायक नाही. तरी सर्व जनतेची मी हात जोडून माफी मागत आहे. यासाठी मला जे प्रायश्चित्त करावे लागेल त्यास मी तयार आहे. केलेल्या वक्तव्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन महानगर पालिकेच्या उपमहापौर पदाचा मी राजीनामा देत आहे.’ अशा आशयाचं पत्र छिंदमने महापौर आणि आयुक्तांना दिलं.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती.

संबंधित बातम्या :

नगर पोलिसांचा चकवा, छिंदमला येरवाड्याला सांगून नाशिक जेलमध्ये नेले!
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम

शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे

 श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत

नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य