शिर्डी: नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात तयार झालेली अभूतपुर्व चलन तुटवड्याची समस्या दूर करण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपावरुन 2 हजार रुपये काढण्याची तरतूद केली. मात्र, पेट्रोल पंपावर स्वाईप करून पैसे काढताना एकूण रकमेवर 3 टक्के पैसे कापले जात आहेत.
दोन हजार रुपये काढायचे असल्यास 57 रूपये आकारले जात आहेत. ग्राहकांना पेट्रोल पंपावर सुट्टे पैसे मिळतायत खरे मात्र त्यासाठी पैसे आकारले जात असल्याने ग्राहकांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. चलन तुटवडा दूर करण्यासाठी एसबीआयसह इतर काही बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.
दरम्यान, आज रविवारी बँका सर्वत्र बंद असल्याने एटीएम सेंटरवर अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. पण तिथेही पैसे संपल्याने अनेकजण पेट्रोल पंपावर पैसे काढण्यासाठी जात आहेत. पण पेट्रोल पंपावर पैसे कापले जात असल्याने ग्राहकांच्या अडचणीत भर पडली आहे.