शिवसेनेनं सत्ता सोडल्याची घोषणा केलीच, तर 3 ते 4 मंत्र्यांचा समावेश असलेले त्यांचे 20 ते 22 आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर असतील आणि त्याचे सर्व पुरावे मी माध्यमांना देईन, असा दावा राणा यांनी केला.
सत्तासुद्धा उपभोगायची आणि सत्तेत राहून विरोधकांसारखी टीकाही करायची, असं पहिल्यांदाच घडलं आहे. मुख्यमंत्री सक्षम असल्यामुळे भाजपचा आलेख चढता राहिला आहे, तर शिवसेनेचा आलेख घसरला आहे, असं रवी राणा म्हणाले. आमचा भाजपला पाठिंबा आहे, मात्र पक्षात जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
विदर्भात राणा समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाले आहेत. गेल्या शनिवारी नागपुरात आमदार रवी राणा यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. यामागेही शिवसेनेचा हात असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन गुंडागर्दीचे आदेश दिले जात असतील, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असंही राणा म्हणाले.