उस्मानाबाद : दैनंदिन आयुष्यात अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांकडे आधार कार्ड आहे. ज्यांच्याकडे नाही, ते अजूनही धावपळ करुन काढतात. त्यातील अनेकांना दिवस-दिवस निघून जातात. मात्र कुणाला जन्मानंतर अवघ्या 6 व्या मिनिटाला आधार कार्ड मिळालं आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात जन्मलेल्या मुलीला अवघ्या 6 व्या मिनिटाला आधार क्रमांक मिळाला. भावना संतोष जाधव असे या मुलीचं नाव आहे.
जन्मल्यानंतर सर्वात कमी वेळेत आधार क्रमांक मिळवण्याचा विक्रम भावना जाधव हिच्या नावावर नोंदला गेला आहे. याआधी मध्य प्रदेशातील झाबुवा येथील राखी या मुलीला जन्मानंतर अवघ्या 22 व्या मिनिटात आधार क्रमांक मिळाला होता. मात्र, झाबुवामधील या मुलीचा विक्रम उस्मानाबादमधील भावना जाधवने मोडीत काढला आहे.
संतोष आणि सुरेखा जाधव या दाम्पत्याची मुलगी भावना हिचा 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी जन्म झाला. त्यानंतर डॉक्टरांच्या तपासणीत तिची तब्येत ठीक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 12 वाजून 9 मिनिटांनी आधार नोंदणी मशिनवर भावनाचा फोटो काढून तिची नोंदणी करण्यात आली आणि आधार क्रमांक मिळवण्यात आला.
आता भावना जाधव ही भारतातील सर्वात कमी वेळेत आधार क्रमांक मिळवणारी व्यक्ती ठरली आहे.