पंढरपूर : निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे नवीन राजकीय मित्र समोर येत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या आघाडीची घोषणा केली आहे. मात्र आघाडी आणखी मजबूत व्हावी यासाठी इतर पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आघाडीसोबत आले तर फायदाच होईल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.


भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली. एबीपी माझाशी बोलताना भुजबळांनी ही माहिती दिली.


राज ठाकरे यांच्याशी जागावाटपाबाबत काही चर्चा सुरु आहे की नाही याबद्दल आपल्याला माहिती नाही. मात्र राज ठाकरे सोबत आले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्याचा नक्की फायदा होईल, असं छगन भुजबळ म्हणाले.


आघाडीला आगामी निवडणुकीत एक-एक मताची गरज आहे. राज ठाकरे यांच्यामागे तर हजारो मतं आहेत. तसेच राज ठाकरे मोदी सरकारच्या विरोधात असल्याने त्यांचा आघाडीला नक्की फायदाच होईल, असं सांगत छगन भुजबळांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत उघड समर्थन केलं.


प्रकाश आंबेडकर आघाडीत येतील : भुजबळ


प्रकाश आंबेडकर आघाडीत नक्की येतील, त्या दिशेने चर्चा सुरु आहे. त्यांना किती जागा देण्यात येतील यावर आपण काही बोलणार नाही. मात्र त्यांचा सन्मान नक्की राखला जाईल, असं छगन भुजबळ म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचीत आघाडीला सोबत आणण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची नुकतीच बैठक झाली होती.