मुंबई : विरोधीपक्ष (धनंजय मुंडे) आणि पालकमंत्री (पंकजा मुंडे) एकत्र आले तर महालक्ष्मीची सर्वोच्च पूजा करेन, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

गेले काही वर्षे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वांना माहीत आहे. मात्र हे दोघे एकत्र आले तर महालक्ष्मीची सर्वोच्च पूजा करेन, असं विधान परिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भाषणावरच्या चर्चेला उत्तर देण्याच्या निमित्ताने मिश्किल शैलीत चंद्रकांत पाटील यावर बोलले. कर्जमाफीवर बोलत असताना धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी शेतकरी यादी पटलावर ठेवण्याची मागणी केली. तेव्हा, यादी ठेवूच आणि जिल्ह्यानिहाय अशा शेतकऱ्यांचे मेळावे घेऊ, तुम्हाला सोबत घेऊन जाऊ, असं मिश्किल भाषेत चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलं.

तेव्हा राष्ट्रवादीच्या बाकांवरुन पालकमंत्री यांना बरोबर घेणार का, असा गंमतीने मुद्दा उपस्थित केला. हा रोख अर्थात धनंजय मुंडे आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दिशेने होता. तेव्हा हे दोघे एकत्र आले तर महालक्ष्मीची मोठी पूजा करेन, अशी कोपरखळी मारत चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं.