जालना : कोरोनाच्या संकटसमयी अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी रुग्णालयांकडून सर्रासपणे केली जात असल्याचं निदर्शनास आलं होतं. यामुळे अनेक रुग्णांची अडचण होत होती. काहींना उपचार घेणेही कठीण जात होते. हीच गोष्ट लक्षात घेत खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची महत्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना उपचार घेणे सोपं होणार आहे. 


जालना जिल्ह्यातील कोरोना संदर्भात राजेश टोपे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलताना त्यांनी म्हटल की, राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी खाजगी रुग्णालयाकडे रुग्णांना जावं लागतंय. मात्र तिथेही रुग्णांकडून भरमसाठ डिपॉझिट आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेणे हा अक्षम्य गुन्हा असून असे डिपॉझिट घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या बाबत  जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.


Mumbai, Pune Corona Crisis: मुंबई, पुण्यात कोरोनाची परिस्थिती बिकट! दोन्ही शहरात विक्रमी रुग्णसंख्येची नोंद


शक्य असल्यास अनावश्यक आरोग्य चाचण्या टाळाव्या- राजेश टोपे


कोरोना संशयित असलेल्या रुग्णांच्या अनेक चाचण्या केल्या जात आहेत. अनावश्यक आरोग्य चाचण्या शक्य असल्यास टाळल्या जाव्यात असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केलं आहे. आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास वापर टाळण्याचं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.


कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार : अमित देशमुख


कोरोनाचा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असं अमित देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.