मुंबई : कोव्हिड-19 या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील जनतेला ह्या अभूतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. शरद पवार यांनी या संदर्भातील एक पत्र ट्वीट केले आहे.
शरद पवार म्हणाले, राज्यातील परिस्थितीवर राज्यशासन, पोलीस व प्रशासकिय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा. राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरता रक्तदान शिबीरांचे देखील आयोजन करावे.
धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर या महामारीवर निश्चित मात करू, असेही शरद पवार म्हणाले.
राज्यात काल विक्रमी रुग्णसंख्येची नोंद
राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध नव्यानं लागू करण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच राज्यातील कोरोनाबाधितांचा दिवसभरातील आकडा आरोग्य विभागानं प्रसिद्ध केला. यामध्ये 24 तासात तब्बल 57,074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्यानं कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत.
राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळं 222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. राज्यात सध्याच्या घडीला गृह लिवगीकरणात आणि संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळं आता आरोग्य सुविधा पुरवण्यावर रुग्णांना पूर्ण आणि योग्य उपचार देण्यावरच प्रशासनाचा भर असणार आहे.
मुंबईतही नियम आणखी कडक
अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत येत्या काळात जिम, मॉल, हॉटेल बंद राहणार असून यामध्ये पार्स सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी लागू असणाऱ्या संचाचरबंदीमध्ये आता फक्त अत्यावश्यक सेवांमध्येच कार्यरत असणाऱ्यांना वाहनं चालवण्याची आणि अत्यावश्यक सेवांच्याच वाहनांपुरता परवानगी असणार आहे. यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवासाची मुभा असेल.