मुंबई : मराठा आरक्षण विधेयक आज राज्य विधीमंडळात मंजूर झालं. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. "परंतु मराठा समाजाला हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करु," असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे.

विधीमंडळात आज मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालं. मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिनही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळेच विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास नसल्याचे मत मांडले. मराठा समाजाला अरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असं ओबीसी संघटनांनी म्हटलं. "तसेच आरक्षणाचे संपूर्ण विधेयक समोर आल्याशिवाय सरकारवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांची फसवणूक करु नका," असा इशारा ओबीसी संघटनांनी भाजपला दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडताना केला. तरीही ओबीसी नेत्यांना यावर विश्वास नसल्याचे पहायला मिळत आहे.

संबधित बातम्या

मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर

मराठा आरक्षण कृती अहवाल आणि विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे