IAS Pooja Khedkar Update :  राज्यभरात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आता वायसीएम रूग्णालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा अहवाल फेटाळण्यात आला आहे.


आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा अहवाल फेटाळण्यात आलेला आहे. पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंहांनी चौकशी अहवालात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. पूजा खेडकरांची तपासणी शिकाऊ डॉक्टरांनी कशी काय केली? कोणत्या पुराव्यांच्या आणि तपासणीच्या आधारे अपंगत्व ठरविण्यात आलं? फिजिओथेरपीस्टने डाव्या गुडघ्यात इजा आढळली नाही, असं नमूद केलं असताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय दिले? हे प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्रे एबीपी माझाने समोर आणली होती, त्यानंतर डॉ वाबळेंनी सादर केलेला चौकशीचा अहवाल आयुक्तांनी फेटाळला आहे. एबीपी माझाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख करत पुन्हा चौकशी करावी आणि अहवालात सुधारणा करावी. असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आता सोमवारी अथवा मंगळवारी चौकशीचा हा सुधारित अहवाल सादर केला जाईल. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.


खरंच पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) डाव्या गुडघ्यात आधु आहे का? नसेल तर मग कोणत्या आधारावर आपण प्रमाणपत्र दिलं? याबाबत सविस्तर अहवाल बनवा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने याबाबत आधीच चौकशीचे आदेश दिलेत. मात्र आम्ही दिलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही, असा दावा डॉक्टर वाबळेंनी केला होता. मात्र आता त्याच वाबळेंसह डॉक्टरांची आणि मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आयुक्तांनी सुरू केली आहे. आयुक्तांनी चौकशीअंती भाष्य करेन, असं म्हणत त्यांनी काल अधिकच बोलणं टाळलं आहे.


याबाबतीत एबीपी माझाशी बोलताना डॉ. राजेश वाबळे म्हणाले, पूजा खेडकरने दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये 40 टक्के दिव्यांग असल्याचं लिहण्यात आलेलं आहे. त्यांंना आम्ही प्रमाणपत्रामध्ये जी टक्केवारी लिहण्यात आलेली ती 7 टक्के इतकी होती. कोणत्याही गोष्टीसाठी लागणारे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 40 टक्के दिव्यांगपणा लागतो. पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) अहमदनगरच्या रूग्णालयातून ते प्रमाणपत्र 2021 साली मिळालेलं होतं. मात्र, तरीदेखील पूजा खेडकरने पुण्यातील रूग्णालयात अर्ज केला. त्यानंतर पुण्यातील रूग्णालयातून 7 टक्के दिव्यांगपणा असल्याचं प्रमाणपत्र दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.