मुंबई : आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेल्या पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) आता नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांना मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र चौकशीआधीच पूजा खेडकर गायब झाल्याचं बोललं जातंय. 


चौकशीआधीच पूजा खेडकर नॉट रिचेबल


सेवेत रुजू होण्याआधीच बडेजाव करत मिजास मारणाऱ्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससीला बनावट मेडिकल सर्टिफिकेट दिल्याचं समोर आलं. ते कमी की काय म्हणून त्यांच्या आईकडूनही पिस्तुल दाखवत शेतकऱ्यांना दादागिरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 


त्यानंतर पूजा खेडकर वादाच्या कचाट्यात सापडल्या आणि त्याचं राज्यातील प्रशिक्षण रद्द करण्यात आलं. पूजा खेडकरांना पुन्हा मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आलं. 


पूजाचे कारनामे, 'माझा'कडून पोलखोल


- 9 जुलै - पूजा खेडकरांनी आयएएस होण्यासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं समोर.


- 10 जुलै - पूजा खेडकरांनी दिव्यांगांच्या कोट्यातून परीक्षा देण्यासाठी दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर. 


- 11 जुलै - ओबीसी कोट्यातून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर आलं. 


- 12 जुलै - पूजाची आई मनोरमा खेडकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर. 


- 13 जुलै - पूजा खेडकरांनी लाल दिवा वापरताना नियमांचा भंग केल्याचं स्पष्ट, पोलिसांकडून कारवाई सुरू.


- 14 जुलै - पूजा खेडकरांनी वापरलेली ऑडी कार पोलिसांकडून जप्त, पूजा खेडकरांचे आई-वडील गायब असल्याचं स्पष्ट.


- 15 जुलै - एमबीबीएस करताना पूजा खेडकरांचं काशीबाई नवले महाविद्यालयात वेगळं नाव असल्याचं समोर. 


- 15 जुलै - वडील क्लास वन अधिकारी असतानाही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देऊन एमबीबीएसला प्रवेश घेतल्याचं समोर. 


यूपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर झाला आणि त्यांना 23 जुलै पर्यंत मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याचे आदेश दिले गेले. त्याची मुदत संपण्याच्या दिवशीच पूजा खेडकर गायब झाल्याचं दिसतंय. 


हे तर झालं पूजा खेडकर यांचं. मात्र पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या, शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत धमकावणाऱ्या आणि आता तुरुंगात असणाऱ्या मनोरमा खेडकरही आणखी गोत्यात येण्याची चिन्ह आहेत.


मनोरमा खेडकरांचा घटस्फोट खोटा?


पूजा खेडकर यांना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्याचा संशय आहे. दिलीप खेडकर यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकरांचा पत्नी म्हणून उल्लेख आहे. खेडकर कुटुंबीयांच्या मालमत्तांचा ताबा दिलीप खेडकर, मनोरमा खेडकरांकडे संयुक्तपणे असल्याचं समोर आलं. त्यामुळे पूजा खेडकरांनी फक्त यूपीएससी परीक्षेमध्ये फायदा व्हावा यासाठी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी घटस्फोटाचा बनाव रचला का? याची चौकशी करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. 


एकीकडे वादात सापडलेल्या पूजा खेडकर चौकशीआधीच नॉट रिचेबल झाल्या. तर दुसरीकडे त्यांच्या आईवडिलांच्या घटस्फोटाची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्यामुळे खेडकर कुटुंबाबाबत बुडत्याचा पाय खोलात असंच काहीसं झाल्याचं दिसतंय. 


ही बातमी वाचा: