मुंबई : कॅबिनेट बैठकीत विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. त्यावर निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का असा सवाल अजित पवारांनी विचारला अशी माहिती सूत्रांनी दिली. 


राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याचं दिसून आलं. आपल्या खात्याला अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली. त्यावर निधी कुठून आणायचा, आता काय जमिनी विकायच्या का असा सवाल अजित पवारांनी विचारल्याची माहिती आहे. 


अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न


त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी काय करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केला. त्यावरून अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. 


एकीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चांवरून चलबिचल सुरू असताना आता नेत्यांमध्येही सर्वकाही आलबेल नाही हे दिसून येतंय. 


महायुतीमध्ये वाद? 


लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेची तयारी सुरू झाली असून महायुतीने सत्ता राखण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. पण निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांआधीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याचं दिसतंय.


अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केक कापण्यात आला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं. काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार, त्यामुळे कोण मुख्यमंत्री होणार यावर चर्चा न करता कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असा आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिला. 


नरेश मस्केंकडून केराची टोपली? 


मुख्यमंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीस यांनी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी फडणवीसांच्या वक्तव्यांना केराची टोपली दाखवल्याचं दिसून येतंय. पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील, त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदावर आमचाच दावा असणार असं नरेश म्हस्के म्हणाले. तर त्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिलं. नरेश म्हस्के हे काही पक्षप्रमुख नाहीत. मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्षांचे नेते प्रमुख ठरवतील. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, त्यामुळे वाद होईल अशी वक्तव्य नरेश म्हस्के यांनी करु नयेत, आता ते खासदार आहेत, त्यांनी जबाबदारीने बोलावे असं  भाजपचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. 


ही बातमी वाचा :