IAS अधिकाऱ्यांनी संपत्ती जाहीर करावी, राज्य सरकारचे आदेश
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 10:14 PM (IST)
मुंबई: राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांना आता आपली संपत्ती जाहीर करावी लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं तसा शासकीय आदेश काढला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आयएएस अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे आयएएस अधिकारी संपत्ती जाहीर करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व आयएएस अधिकाऱ्यांना एका बंद लिफाफ्यात आपल्या संपत्तीचं विवरणपत्र जमा करावं लागणार आहे. तसंच त्या विवरण पत्रावर अधिकाऱ्यांची सही असणं देखील बंधनकारक असणार आहे. कायद्याच्या बदलानुसार अधिकाऱ्यांना माहिती द्यावीच लागते. मात्र, यंदा संपत्ती जाहीर करण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता 31 जानेवारीपर्यंत आयएएस अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.