मुंबई : राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांना आता आपली संपत्ती जाहीर करावी लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं तसा शासकीय आदेश काढला आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आयएएस अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थावर आणि जंगम मालमत्ता घोषित करण्यास या परिपत्रकात सांगितलं आहे. जे आयएएस अधिकारी संपत्ती जाहीर करणार नाहीत किंवा अर्धवट माहिती देतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
सर्व आयएएस अधिकाऱ्यांना एका बंद लिफाफ्यात आपल्या संपत्तीचं विवरणपत्र जमा करावं लागणार आहे. तसंच त्या विवरणपत्रावर अधिकाऱ्यांची सही असणं देखील बंधनकारक असणार आहे.