मराठवाड्यातील भाजपच्या काही बड्या नेत्यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपलं राजकीय वजन वापरुन ही बदली रोखल्याची जोरदार चर्चा आहे. राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले होते. मात्र केंद्रेकरांच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आल्याचं अप्पर मुख्य सचिवांकडून कळवण्यात आलं. त्यामुळे मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदी आता पुरुषोत्तम भापकरच कायम राहतील.
विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची मुंबई येथे पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. तर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे सचिव सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
राजकारण्यांना सुनील केंद्रेकरांची धास्ती?
सुनील केंद्रेकर यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द चांगलीच गाजली होती. मात्र तिथेही त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीनंतर सामान्य जनता रस्त्यावर उतरली होती.
विक्रीकर सहआयुक्त असताना त्यांनी कर वसुली मोठ्या प्रमाणात वाढवली. औरंगाबादला सिडकोचे मुख्य प्रशासक आणि औरंगाबाद महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून काम करत असतांना काही महिन्यात त्यांनी येथील कारभार व्यवस्थित केला.
महापालिकेला शिस्त लागत असतानाच त्यांची राज्याचे कृषी आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. कृषी खात्याचा पदभार स्वीकारताच त्यांनी गावागावात जाऊन कृषी योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना लाभ मिळतो की नाही याची पाहणी करत कामचुकार अधिकाऱ्यांना धडकी भरवली होती. त्यानंतर त्यांची क्रीडा खात्याचे सचिव म्हणून बदली करण्यात आली.