पुणे : 'देवेंद्रजी...', असं म्हणत चंद्रकांत पाटील यापुढं जे काही म्हणाले, ते सर्वांच्याच भुवया उंचावून गेलं. मी कोल्हापूरला परत जाणार, असं वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी अनेक चर्चांना वाव दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष पदी असणाऱ्या पाटील यांच्या या वक्तव्यामुळं बऱ्याच राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.
पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं. पण, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. कोल्हापूरच्या मतदार संघाकडे पाठ फिरवत पाटील यांनी पुण्यातील मतदार संघाची निवड करत सोपी खेळी खेळली अशा आशयाचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. किंबहुना हे आरोप सातत्यानं सुरुच आहेत. परिणामी राजकीय कारकिर्दीतील पुढची निवडणूक ही कोल्हापुरातूनच लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. पाटील यांनी पुण्याशी दुरावा पत्करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर त्यावेळी तेथे असणाऱ्या सर्वांच्याच चेहऱ्यावर मिश्किल स्मित उमटलं.
'पुणे, सर्वांनाच आपलंसं करुन घेतं. इथं प्रत्येकाला सेटल व्हावसं वाटतं.... नाही, मी जाणार. देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे. माझ्या विरोधकांनाही हे सांगा', असं ते म्हणाले. पाटील यांनी लगावलेला हा टोला आता विरोधक कोणत्या पद्धतीनं स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाहीतर हिमालयात....
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चंद्रकांत पाटील पुण्याच्या कोथरुड मतदार संघातून उभे राहिले होते. त्यावेळी या मतदार संघाची निवड करत त्यांनी सोपा मार्ग अवलंबल्याच्या अनेक टीकाही करण्यात आल्या. परकीय भावनेची जाणीवही त्यांना करुन देण्यात आली. पण, कोल्हापुरातून आपण निवडून येऊ असा आत्मविश्वास व्यक्त करत तसं न झाल्याच हिमालयाची वाट धरणार असल्याच्या आशयाचं लक्षवेधी वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता थेट आणि स्पष्टपणे कोल्हापूरलाच जाणार असल्याचं म्हणणारे पाटील नेमके कोणते संकेत देऊ इच्छितात हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.