नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची मी भेट घेतल्याच्या चर्चा सुरु असताना, कुटुंबीयांसोबत 'पद्मावत' सिनेमा पाहत होतो, असा दावा करत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्लीला जाऊन एकनाथ खडसेंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून हा दावा करण्यात आल्यानंतर खडसेंनी उत्तर दिलं. इतकंच नाही, आपल्यावर आरोप झाल्यानंतर आपण राजीनामा देण्याची हिंमत दाखवली, तशी हिंमत शिवसेना का दाखवत नाही? असा बोचरा सवालही त्यांनी शिवसेनेला केला.

मोहन प्रकाश-पृथ्वीराज यांच्या भेटीवर स्पष्टीकरण

मी जळगावला विमानतळावर होतो. त्यावेळी काँग्रेसची एक बैठक औरंगाबादला होती. त्यामुळे वेटिंग रुममध्ये मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण, मी आणि 15-16 जण होतो. आम्ही एकत्र कॉफी घेतली. एकाच विमानाने आलो. ते मागच्या बाजुला होते, तर मी पुढे होतो. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे मी हॉस्पिटला गेलो, असा दावा खडसेंनी केला.

'सामना' शोधपत्रकारितेत कमी पडतंय, राहुल गांधींसोबत मी भेट घेतल्याच्या बातम्या आल्या, त्यावेळी मी दिल्लीत कुटुंबासोबत 'पद्मावत' पाहत होतो, असं एकनाथ खडसे म्हणाले.



जळगावात काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या व्यासपीठावरुन खडसेंनी भाजपला उघड इशारा दिला होता. भोसरी एमआयडीप्रकरणी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यानंतर महसूलमंत्रीपदावरुन त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी खडसे यांचं काँग्रेसमध्ये जंगी स्वागत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल गांधींच्या कथित भेटीपूर्वी खडसे यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी खडसे यांची कन्या शारदा आणि सून, खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

खडसेंची नाराजी

भोसरी जमीन प्रकरणानंतर मंत्रिपदावरुन हटवल्यानंतर एकनाथ खडसेंनी नेहमीच जाहीर व्यासपीठावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यात गेल्या काही दिवसात तर त्यांना काँग्रेसमधूनही पक्षात येण्याच्या जाहीररित्या ऑफर दिल्या गेल्या. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे आणि मोहन प्रकाश यांची भेट झाल्याने चर्चेला एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले आहे.

संबंधित बातम्या


औरंगाबादमध्ये खडसे, मोहन प्रकाश आणि पृथ्वीराज चव्हाणांची भेट  

भाजप सोडण्याचा विचार नाही, पण पर्याय काय?: एकनाथ खडसे

पदर ढळल्यावर ऑफर यायचीच, ‘सामना’तून खडसेंवर वार