मुंबई:  रियाज भाटीवरुन सुरु झालेलं वादळ राष्ट्रवादीच्याच अंगावर येण्याची चिन्ह आहेत. कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो, असा दावा भाटी यांनी एबीपी माझाच्या 'माझा विशेष' कार्यक्रमात केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी मला पद दिलं होतं, असं भाटी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी मुंबईत मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होतो, असं भाटी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाटी प्रकरण राष्ट्रवादीवरच बूमरँग होण्याची शक्यता आहे.



नवाब मलिक यांचा आरोप

अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या भाजप कार्यकारिणीचे सदस्य आणि गुंड रियाज भाटी यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

रियाज भाटी यांचे थेट दाऊदशी संधान असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.

दाऊदशी संबंध असणाऱ्या रियाज भाटीला भाजपानं पाठिशी घातलं आणि आशिष शेलारांनी भाटी यांना एमसीएच्या मार्केटिंग कमिटीत घेतलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

रियाज भाटी यांनी आशिष शेलारांना एमसीए निवडणुकीत मतं मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या प्राध्यापकांना धमकावल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद

आशिष शेलार यांचं उत्तर

नवाब मलिक यांनाच गँग आणि टोळ्यांची गरज निवडणुकीत भासते. त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. जुनेच काहीतरी आठवते. त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. मी नवाब मलिकांवर न्यायालयात मानहानीची केस दाखल करणार आहेच. शिवाय मीच पोलिस आयुक्तांना फोन करून रियाज भाटी प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे, असं उत्तर आशिष शेलार यांनी दिलं.

'भाटी कोण पवारांनाच विचारा'

दाऊदशी कथित संबंध असणारे रियाज भाटी कोण आहेत हे पवारांना विचारा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलं. शरद पवार यांनीच रियाज भाटी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका महत्त्वाच्या पदावर घेतलं होतं. त्यामुळे रियाज भाटी कोण हे पवारांना विचारा, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे.

रियाज भाटींचं स्पष्टीकरण

दाऊशी आपला काहीही संबंध नाही. दाऊदचा माणूस असतो, तर आपल्याला संरक्षण कसं मिळालं असतं, असा सवाल रियाज भाटींनी केला आहे. माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही, पण पासपोर्टप्रकरणात खटला सुरु आहे. मात्र माझ्याकडे दोन पासपोर्ट नाहीत, असा दावा भाटींनी केला

नवाब मलिकांवर खटला दाखल करणार

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही रियाज भाटी यांनी सांगितलं आहे.

माझा विशेष संपूर्ण व्हिडीओ



संबंधित बातम्या

ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण

रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार

स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद