Navneet Rana Amravati : मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय. विद्यार्थी जीवनात असे मंच फार महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात. आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळालं तर आपण अधिक जोमाने काम करत असतो. असे असले तरी मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली. मी कुठं तरी कमी पडली असेल, मात्र मी कधीही हार मनाली नाही. माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला. मात्र चमकणारा तारा नेहमी चकमतच राहतो, मग तो कुठेही राहो. आता आगामी काळात मी परत तयारी करून परत राजकारणाच्या नव्या मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी निर्धार केला आहे. अमरावती (Amravati) येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
माझी अमरावती 10 वर्ष मागे गेलीय, त्याची जबाबदारी आता कोण घेईल?
आधी नवनीतला हरवलं आता रवी राणाला हरवू, असे काही लोक म्हणतात. पण जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे. मी हरली पण मी कधीही हार नाही मानली. माझ्या पराभवानंतर आमदार रवी राणा यांनी मला प्रोत्साहित केलं. किंबहुना त्यांनी मला पुन्हा उभे राहण्याचेही सुचवले. आयुष्यात ते कायम माझ्या पाठीशी राहिले आहे. असे प्रोत्साहन नक्कीच यश खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार, पण ज्यांनी नाही केलं त्यांना एकच सांगते की, 10 वर्ष अमरावती मागे गेलीय, त्याची जबाबदारी आता कोण घेईल. आपण सगळ्यांनी मेहनत केली. आता देखील कंबर कसून विधानसभेत तुमची तयारी हवी आणि यावेळी पुन्हा एकदा ताकद दिसली पाहीजे. असे आवाहन ही नवनीत राणा यांनी केलंय.
नवनीत राणा यांना किती मतं मिळाली?
अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना 526271 मिळाली. नवनीत राणा यांना 506540 मतं मिळाली. राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला. 57.46 टक्के मतदान झालं होतं. 2019 मध्ये अमरावतीमधून नवनीत राणा विजयी झाल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार 951 मतांनी पराभव केला होता. नवनीत राणा यांना 510947 मते मिळाली. तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 73 हजार 996 मते मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या