सांगली : “मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. मात्र, जर चळवळीची मशागत चांगली झाली असेल, तर नवी पेरणी करू नको, अस मुलांना का सांगू?”, असे ‘स्वाभिमानी’चे नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले. ते सांगलीत एबीपी माझाशी बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं की, सदाभाऊंनी मुलाला उमेदवारी देणं, मला आवडलं नाही. एकंदरीत राजू शेट्टींनी सदाभाऊंच्या मुलाच्या उमेदवारीवरुन जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सदाभाऊ खोत यांचं हे स्पष्टीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे.
स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडणार?
स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडेल, ही जिल्हा परिषद निवडणुकीतील पेल्यातलं वादळ आहे. निवडणुका झाल्या की हे वादळ शांत होईल, असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं.
‘वेट अँड वॉच’
सदाभाऊ सत्तेतून बाहेर पडतील, यावर योग्य वेळ आल्यावरच बोलेन. सध्या माझी वेट अँड वॉचची भूमिका आहे, असेही सदाभाऊंनी सांगितले.
“स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांबरोबरच मी भाजपच्या प्रचाराला जाणार असून, भाजप नेते आमच्या कार्यकर्त्यांना फूस लावतात हा अनुभव मला तर अजून आला नाही. निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते इकडे तिकडे जात असतात. त्यामुळे भाजप आमची संघटना फोडतेय असे दिसत नाही.”, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
मुलाच्या उमेदवारीवर सदाभाऊ काय म्हणाले?
राजू शेट्टी आणि मी फार जुने मित्र आहोत. जो निर्णय घेऊ, तो दोघांच्या विचाराने घेऊ, असे सांगायलाही सदाभाऊ विसरले नाहीत.
खासदार राजू शेट्टी यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं होतं की, भारतीय जनता पक्षाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फोडण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर समीकरणं बदलू शकतात, असंही राजू शेट्टी म्हणाले होते.