सोलापूर : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशाप्रकारे जबरी चोरीचा बनाव करुन स्वत:च्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे कोणताही प्रत्यक्षदर्शी नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरव्यांची साखळी जुळल्याने गुन्हा सिद्ध झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील मनिषा फुगारे हिचा खामसवाडी येथील महेश मिसाळ याच्याबरोबर 7 मे 2017 साली विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहायला होते. लग्नानंतर मनिषा हिला आपला पती सतत एका महिलेशी फोनवरुन बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिने आपल्या माहेरी देखील कल्पना दिली होती.


2 जानेवारी 2018 रोजी महेश मनिषाला घेऊन अचानक सासुरवाडीला आला. त्यानंतर तिथून तो मनिषाला घेऊन बार्शीतल्या पाथरी येथे आपल्या बहिणीकडे गेला. त्यानंतर संध्याकाळी परत येत असल्याने मनिषा हिचे वडील दादाराव फुगारे यांना फोनवरुन सांगितले. मात्र उशीर झाल्यानंतर ही मुलगी-जावई न आल्याने दादाराव यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचे फोन लागत नव्हते. त्यामुळे नातेवाईंकासह दादाराव शोधण्यासाठी निघाले. रात्री येरमाळ्याजवळ रस्त्याच्या कडेला जावयाची दुचाकी पडलेली आढळली. त्याशेजारी मनिषाचा मृतदेह देखील सापडला. मनिषाच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. मात्र त्या ठिकाणी महेशचा आढळला नाही. त्यामुळे त्यांनी जवळच असलेल्या पांगरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.


त्यानंतर जावई महेश मिसाळ हा उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल असल्याचे कळले. महेश याला विचारणा केली असता चोरट्यांनी आपल्यावर हल्ला केला. त्यात आपण जखमी झालो आणि मनिषाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र ही बाब पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन स.पो.नि. धनंजय ढोणे यांना शंकास्पद वाटली. महेश याच्या अंगावर असणाऱ्या जखमा या किरकोळ होत्या. त्यामुळे धनंजय ढोणे यांनी महेश मिसाळ याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.


लग्नापूर्वीच नात्यातील एका मुलीसोबत आपले प्रेमसंबंध होते. प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. मात्र त्यावेळी पत्नी मनिषा ही गर्भवती होती आणि ती लग्नाला अडसर ठरत होती. त्यामुळे डोक्यात दगड मारुन आणि चाकूने हल्ला करुन खून केल्याची कबुली आरोपी महेश मिसाळ याने कोर्टात कबुली दिल्याची माहिती सरकारी वकील अॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी दिली. या प्रकरणी एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता, मात्र केवळ परिस्थितीजन्य पुरावे व्यवस्थितपणे सादर केल्याने न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेचा तपास पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन स.पो.नि. धनंजय ढोणे यांनी केला. तर न्यायलयात सरकारतर्फे अॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी बाजू मांडली.